देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाशी लढा चालू असताना भारतीयांनी जनता कर्फ्युनिमित्त दाखवलेली शांतता आणि संयमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रभावावर नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या संवादात भाष्य केलं. सोशल डिस्टन्स पाळणे हाच कोरोनाशी लढण्यासाठी जालीम उपाय असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत लागू केलेली संचारबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांची संचारबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मध्यरात्रीपासून लागू केली आहे. कोरोना – कोई रोड पे ना निकले अशा आशयाचा संदेश मोदींनी यावेळी दिला.

मी तुमचे काही दिवस मागण्यासाठी पुन्हा येणार आहे असं मी मागेच म्हटलो होतो याचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा दाखला यावेळी दिला. कोरोनाचे संक्रमण पहिल्या लाखभर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ६७ दिवस लागले मात्र पुढील लाखभर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी केवळ ११ दिवस लागल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

युरोपीय राष्ट्रांची साधनसामग्री अत्याधुनिक असतानाही त्यांना कोरोनाशी लढताना अपयशच आलं. त्यामुळे या राष्ट्रांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी जो पर्याय राबवण्यात आला, घरात थांबण्याचा तोच आपल्याला राबवावा लागेल असं मोदी यावेळी म्हणाले. घराचा उंबरठा हीच आपली लक्ष्मणरेषा आहे हे समजून घ्या आणि महामारीविरुद्ध लढण्यासाठी घरातच थांबा असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. धैर्य आणि शिस्त दाखवूनच आपण या अडचणीला सामोरं जाऊ शकतो. घरात थांबलेलं असताना महामारीविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, अम्ब्युलन्स चालक, पोलीस, सफाई कामगार यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा विचारही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवला.

गरिबांसाठी हा मोठा कसोटीचा काळ असून त्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील राहील असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. जान हैं तो जहाँ हैं असं म्हणत आधी स्वतःचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्यायला हवं यावर मोदींनी आपल्या भाषणात जोर दिला.