निर्माण – सामाजिक क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्यासाठीचा एक प्रयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष लेख । अमृत बंग

महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने “निर्माण”हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला…त्याविषयीआणि त्यातील तरुणाईविषयी….

Untitled design (15).jpg

सत्तर – ऎंशीच्या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहित आहे. त्यावेळचे वातावरण देखील अशा प्रकारच्या निर्णयाला पोषक असे होते. दरम्यानच्या काळात झालेल्या भांडवलशाहीच्या प्रसारामुळे मात्र आपल्या जीवनाकडे बघण्याचा आजच्या आमच्या युवा पीढीचा दृष्टीकोन खूप बदलला आहे आणि “अधिकाधिक पैसा कमावणं हेच जणू जगण्याचे एकमेव ध्येय आहे” असा विचार अनेकांच्या मनावर बिंबलेला दिसतो. आणि म्हणून सामाजिक कृती तर दूर पण साध्या संवेदनशीलतेचा देखील अभाव अनेक ठिकाणी जाणवतो. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न सोडविण्याचे आव्हान घ्यायला इच्छूक व सक्षम असे युवा ‘चेंज मेकर्स’ फारसे नाहीत ही एक मोठीच अडचण आहे. यालाच हातभार लावते आजची शिक्षणव्यवस्था!

 

सध्याचे शिक्षण हे फक्त माहिती देतं, क्वचित काही कौशल्य देतं पण अर्थपूर्ण हेतू मात्र देत नाही, तर युवांचा केवळ आर्थिक शर्यतीत धावणारा घोडा बनवतं. निव्वळ परीक्षार्थी शिक्षणाने तरुणांचा ‘करियर आणि पैसा’ या चढाओढीतला अभिमन्यू झाला आहे. याहून अधिक समृध्द, समाधानी व उद्देश्यपूर्ण अशा जीवनापासून ते वंचित होत आहेत. जर असे व्हायचे नसेल तर मग जीवनात अर्थपूर्ण आव्हाने शोधणाऱ्या युवापिढीची व समाजातील प्रश्नांची सांगड घालता येईल का, ह्या विचारातून प्रेरित होऊन २००६ साली ‘निर्माण’ ह्या शिक्षणप्रक्रियेचा जन्म झाला. आजच्या युवापिढीकडे असलेली कौशल्ये व ज्ञान वापरून समाजातील प्रश्न सोडवण्याकरिता कृतीसाठी त्यांना प्रेरित व सक्षम करणे, हा ‘निर्माण’ प्रक्रियेचा पाया आहे.

आज भारताची अर्धी लोकसंख्या 25 वर्षाखाली आहे.  2020 साली भारतातील लोकांचे सरासरी वय हे 29 वर्षे असेल जेव्हा की जपान मध्ये ते 48 वर्षे असेल. अर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद व भविष्य आहे. समाजातील जटिल आणि ज्वलंत अशा विविध समस्यांवर उपाय शोधणे हे आव्हान युवा या पिढीसमोर आहे. सोबतचं स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन मिळणे व सुयोग्य करियर निवडता येणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे दुहेरी आव्हान पेलण्यासाठी त्यांना सक्षम करावे या हेतूने चाललेली निर्माण ही एक शोधप्रक्रिया आहे. महात्मा गांधींच्या नई तालिम या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून आकार घेत असलेली निर्माण प्रक्रिया युवांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावेयासाठी प्रयत्नशील आहे.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तीन शिबिरांची एक मालिका विकसित करण्यात आली आहे. ही शिबिरे हा निर्माण शिक्षण प्रक्रियेचा गाभा आहेत. १८ ते २८ ह्या वयोगटातील युवांची दर सहा महिन्यातून एकदा अशा प्रत्येकी ८ दिवसांच्या तीन निवासी शिबिरांची एक मालिका दर दीड वर्षाने सर्च, गडचिरोली येथे होते. या शिबिरांदरम्यान स्वतःची ओळख, स्वत:च्या भावनांची व शरीराची ओळख, माझ्या आजूबाजूच्या समाजाची व निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न व त्या सोडवण्याच्या वेगवेगळया पद्धती, प्रत्यक्ष सामाजिक काम करणाऱ्या विविध लोकांसोबत संवाद अशा टप्प्यांमधून जात जात ‘मी जीवनात आता काय करू’ या निर्णयापर्यंत शिबिरार्थी येतात.
शिबिरांदरम्यान सहभागी युवक – युवती विविध खेड्यांत देखील राहतात.त्या खेड्यांतल्या एखाद्या घरात त्या घरातल्यांप्रमाणे ते राहतात. ते जे काम करतीलते करायचं, ते जे खातात ते खायचं, जसे झोपतात तसं झोपायचं! जर ते शेतावर रोवणी करायला चालले तर यांनीही जायचं. ती बाईजर लांबून पाणी आणत असेल सकाळी तर यांनी पाणी आणायचं. थोडक्यात तिथलं वास्तव समजूनघ्यायचं! मात्र यासोबतच समाजातील प्रश्नांना आणि आव्हानांना आपल्याला बौद्धिकदृष्ट्या देखील पाहता आलं पाहिजे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांकडे केवळ भावनिक उमाळ्यातून बघू नये, तर त्यात आपण आपलं व्यावसायिककौशल्य आणि बुद्धिमत्ताही आणायची गरज आहे. यासाठी खेड्यांमधून परत आल्यावर शिबिरार्थ्यांची विविध समस्यांवर कार्यरत असणाऱ्या रिसोर्स पर्सन्सशी भेट होते. कधी पाणी प्रश्नावर काम करणारे राजस्थानातील डॉ. राजेंद्र सिंग, तर कधी ग्रामीण भागातील तंत्रज्ञानावर काम करणारे डॉ. आनंद कर्वे, तसेच अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, विजय जावंधिया, गिरीश सोहनी, डॉ. आनंद करंदीकर, शारदा साठ्ये,ज्योती म्हापसेकर, उषा राणे, संजय पाटील, मनिष राजनकर, विश्वंभर चौधरी, विवेक सावंत, डॉ. योगेश कालकोंडे, हरीश हांडे, विजय अन्ना बोराडे, मकरंद सहस्रबुद्धे, मिलिंद बोकील, अश्विनी कुलकर्णी, मिलिंद मुरूगकर, इ. अनेक जेष्ठ कार्यकर्ते निर्माण मध्ये तरुणांशी संवाद साधायला, त्यांच्या कामाबद्दल बोलायला, प्रश्नांचे गांभीर्य मांडायला व प्रश्न सोडविण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गांवर चर्चा करायला येतात. इतकेच नव्हे तर हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. रिचर्ड कॅश, पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील प्रो. केन्विन स्मिथ, प्रो. अॅन्डी लामास अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांचे मार्गदर्शन देखील निर्माणींना लाभले आहे. ह्या सर्व अनुभवातून शिबिरार्थी त्यांना भावणारे प्रश्न निवडून त्यावर छोटे छोटे कृती गट करून त्यांच्या पातळीवर कामे सुरु करतात. तसेच त्यांच्या जीवनशैलीतही समाजाच्या हितार्थ छोटे छोटे बदल करू लागतात. आपला स्वभाव, स्वधर्म आणि आजच्या घडीचा युगधर्म ह्यांची सांगड घालून स्वत:चे जीवितकार्य कसे निवडावे ह्यावर डॉ. अभय बंग मार्गदर्शन करतात. निर्माण शिबिरांच्या शेवटपर्यंत अनेक मुले पूर्णवेळ एखाद्या प्रश्नावर काम करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. सहभागी तरुण-तरुणींचा स्वत:कडून समाजाकडे असा हा प्रवास सुरु होतो.

Untitled design (14)

निर्माण शिक्षणप्रक्रियेतील एक महत्त्वाचे गृहितक हे आहे की ‘स्व’ ची ओळख ही काही गुहेत बसूनहोत नाही. आपला ‘स्व’ हा प्रकाशासारखा आहे असं ही प्रक्रिया मानते. आपल्याला निव्वळ प्रकाशकधीच दिसत नाही. तर जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर आदळून परावर्तित होईल, तेव्हा ती वस्तूप्रकाशमान, दृश्य होते आणि तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो. तसंच ‘स्व’ बाबत देखील आहे… जेव्हाआव्हान सामोरं येतं, तेव्हा ‘स्व’ दृश्यमान होतो. कृतींमधून आणि आव्हानांनासामोरं जाऊनच ‘स्व’ला त्याची ओळख पटते. आणि ‘स्व’च्या शोधासाठी जेव्हा मी समाजात मिसळेन तेव्हा आपोआपच मला समाज कसा आहे ते हीकळेल. सार्वजनिक आरोग्याच्या काय समस्या आहेत हे समजायचं असेल तर सरकारीप्राथमिक आरोग्य केंद्रावर काय अवस्था आहे, ते तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहायचं.कचर्‍याची काय समस्या आहे, ते कचर्‍याच्या गाडीवर कचरा कामगारांसोबत बसायचं आणि डंपिंग ग्राऊंडवर जाऊन बघायचं. अशा प्रकारच्या शिक्षणप्रक्रियेला निर्माणमध्ये उत्तेजन मिळते.

2006 – 2019 या काळातल्या निर्माणच्या 9 बॅचेस मध्ये बाराशेहून अधिक युवक-युवती सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 36जिल्हासोबत भारतातील 13 राज्यामध्येपसरलेल्या या युवांमध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, फिल्म-मेकर, पत्रकार, शेतकरी, विज्ञान, कला, वाणिज्य, इ. सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आहेत. मुले व मुली यांचे प्रमाण हे 53:47 असे आहे. यापैकी350 हून अधिक युवा हे आज पूर्णवेळ सामाजिक समस्यांवर कार्यरत आहेत. विविध स्वयंसेवी संस्था, दुर्गम भागात शासकीय सेवा, सोशल एंत्रप्रुनरशिप, फेलोशिप्स, इ. च्या माध्यमातून हे युवा कार्यरत आहेत. सोबतच ऐंशीहूनअधिक विविध सामाजिक संस्था आणि110 हून अधिक कार्यकर्ते, मार्गदर्शक यांचे एक नेटवर्क उभे राहिले आहे. निर्माण मधील अनेक युवांनी विविध नामवंत विद्यापीठातून शिक्षण घेतले असुनही, जसे की, जॉन्स हॉपकिन्स, हारवर्ड व पेनसिल्वेनिया विद्यापीठ, आय.आय.टी. मुंबई, आय.आय.टी. दिल्ली, आय.आय.टी. कानपूर, आय.आय.टी.मद्रास, IISER Pune, IISER Bhopal, AIIMS Delhi, AIIMS Raipur, यु. डी. सी. टी. मुंबई, महाराष्ट्रातीलशासकीय वैद्यकीयआणि अभियांत्रिकी महाविद्यालय इत्यादी, आज त्यातील अनेक जण करिअरच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर पडून सामाजिक प्रश्नांवर काम करताहेत.

Untitled design (18).jpg

 

गडचिरोली, छत्तिसगढ, कालाहंडी, दल्लीराजहरासारख्या विविध दुर्गम भागात आरोग्य सेवा देणारे रितूदमाहे,सुरज म्हस्के, अश्विनी महाजन, हृषिकेश मुन्शी, प्रथमेश हेमनानी, अमित ढगे, विठ्ठल साळवे, शिवप्रसाद थोरवे, सचिन बारब्दे, स्वाती देशमुख, युगंधरा काटे, आरती गोरवाडकर, स्मिता तोडकर, चेतना सोयाम, वैभव आगवणे, सुजय काकरमठ, विक्रम सहाने, भूषण देव, दिग्विजय बंडगर, मनवीन कौर, अभिषेक पाटील, मृदृला भोईरइ. तरूण डॉक्टर्स

 

ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे मयुर सरोदे, निखिल जोशी, अश्विन पावडे, महेश लादे, अश्विन भोंडवे, निरंजन तोरडमल, कुणाल पवार, उमेश जाधव, हृतगंधा देशमुख,सुयश तोष्णीवाल, सागर बेंद्रे सागरइ. युवा अभियंते

पर्यावरणाच्या व शेतीच्या क्षेत्रात काम करणारे अमृता प्रधान, सजल कुलकर्णी, तन्मय जोशी, गणेश बिराजदार, रंजन पांढरे, प्रतिक उंबरकर, रश्मी महाजन, पवन मुत्तेमवार, मंदार देशपांडे इ. युवा कार्यकर्ते

 शासकीय योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी यासाठी धडपडणारे अजय होले, गोपाल महाजन, आकाश बडवे, यतिन दिवाकर, निखिल मुळे, राहुल फटिंग, राहुल मोडक, गजानन आंबोरे, संकेत कदम, रवींद्र चुनारकर आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे प्रफुल्ल शशिकांत, शैलेश जाधव, अतुल गायकवाड, सायली तामणे, सुहास शिगम, निखिलेश बागडे, सागर आबने, श्रद्धा चोरगी, प्रणाली दंडवते, शैलेश जाधव, प्राची माकडे यांसारखे निर्माण प्रक्रियेतील अनेक तरुण- तरुणी हे एक वेगळा पायंडा पाडताहेत.

Untitled design (20).jpg

निर्माणींचा वैयक्तिक क्षमताविकास, त्यांच्या कामातून समाजातील प्रश्नांना सोडवण्यासाठी कृती तर होते आहेच पण सोबतच “मी काय करू?” हा सर्वच तरुणांच्या पुढ्यात असलेला ब्रह्मप्रश्न देखील आपोआप सुटतो आहे. काही निर्माणी याबाबतीत फार बोलके आणि मार्मिक सांगतात.

“निर्माण शिबिराआधी ‘मी’ म्हणजे काय, माझ्या शिक्षणाचा समाजाला काय उपयोग? याच्याबद्दल मी कधी विचार केला नव्हता. निर्माणने मला हा विचार करायला भाग पाडलं. विचार अधिक स्पष्ट होत गेले. मीच स्वतःला नव्याने कळायला लागलो.”
– सजल कुलकर्णी, नागपूर, MSc Biodiversity, प्रकल्प वैज्ञानिक, बायफ

 

“Latest मोबाईल, कंप्युटर गेम मधला high score, देशाचा आर्थिक विकासदर या गोष्टींमधे समाधान शोधू नये. खुश होण्यासाठी अनेक नैसर्गिक कारणे उपलब्ध आहेत. If acceleration is satisfaction, then frustration is the destination! कुठवर पळणार?
गाव, भाषा, प्रदेश, संस्कृति या चष्म्यांचा रंग उतरला. गोष्टी जास्त स्पष्ट दिसू लागल्या.
शिबीरातल्या वेगवेगळ्या sessions मधून अनेक समस्यांची सखोल ओळख झाली.एक खूपच चांगला ग्रुप मिळाला.निर्माणचे resources उपयोगी पडत आहेत, यापुढेही उपयोग होत राहील.”
– निरंजन तोरडमल, अहमदनगर, B.E. (Mechanical Engineering), MIT

 

 

‘कर के देखो’ फेलो
“शिक्षण, नोकरी, सेटलमेंट या जीवनाच्या आयोजनाच्या प्रश्नांनी इतकं घेरलं होतं की जीवनाचं नेमकं प्रयोजन काय, हे सगळ कशासाठी, याचा आता विचार करू लागलोय. आता एक ठरवलंय की ‘जशा जगात मी जन्माला आलो, तशा जगात मी अजिबात मरणार नाही’.”
– अमोल शैला सुरेश, नाशिक, B.E. (Mechanical Engineering), MIT Pune

 

“I got a value system, lots of guides and friends that washed away my feeling of loneliness.
NIRMAN gave me confidence and vigor, nurtured my social aspect without forcing anything. NIRMAN availed me the opportunity to serve.”

  • डॉ. गजानन फुटके, परभणी, MBBS, DNB (Family Medicine)
    “System ला फ़क्त नावं न ठेवता त्यातली weak link शोधून काम कसं करता येईल हे निर्माणमुळे शोधता आलं.”
  • अमृता ढगे, अंबरनाथ, Sir J.J. School of Arts (Masters in Fine Arts)

“सिर्फ random acts of kindness जैसे की tree plantation, blood donation काफी नहीहै, तोsocial problem solving कि जरुरत है, ये attitude मुझे निर्माण से मिला|”
– डॉ.मनवीन कौर,MBBS GMC, Aurangabad

“मला काय करायला आवडतं या सोबतच माझी गरज कुठे हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे, हेमला निर्माणमध्ये कळालं.”
– सतीश गिरसावळे, B.E. Government Engineering College, Chandrapur

“प्रश्न कसे व्यवस्थित विचारावे किंवा प्रश्नामध्ये स्पष्टता नेमकी कशी आणावी हे निर्माणमध्ये शिकलो.”
– स्वानंद खानापूरकर, MS Theoretical Physics, I.I.S.E.R. Pune

अगदी स्वातंत्र्य आंदोलनापासून कायमच महाराष्ट्र हे विविध सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिले आहे. ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ अशी या राज्याची देशाला ओळख होती. १९९१ पासून पुढील प्रवासात विविध आर्थिक निकषांवर प्रगतीपथावर राहिलेल्या आपल्या राज्यात युवकामधील सामाजिक जाणीव व कृतीशीलता मात्र जणू लुप्त होत चालली होती. ’आर्थिक’चिंता वा हव्यास’ याच्यापुढे जाउन ‘जगण्यातील अर्थपूर्णतेचा ध्यास आणि समाजातील विषमतेचा ह्रास’ या अनुषंगाने आजची तरुणाई काय करू शकते याची सम्यक प्रक्रिया म्हणजेच निर्माण! अजून बरीच मजल मारायची बाकी आहे पण आज अनेक लुकलुकते दिवे जागोजागी प्रकाशमान होत आहेत ही मला अत्यंत सकारात्मक बाब वाटते.

इतर प्राण्यांपासून मनुष्याला वेगळे करणारी एक बाब म्हणजे आपले जीवन हे केवळ प्रकृतीवर (Nature) नाही तर संस्कृतीवर (Culture)देखील आधारलेले असणे. आणि ह्याच संस्कृतीचा, त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विज्ञान – तंत्रज्ञानाचा, त्यामुळे झालेल्या भौतिक प्रगतीचा (!), बदललेल्या जीवन ध्येयांचा परामर्श घेऊन युवा पिढी आज काय विचार करते हे प्रथम समजून घ्यायला हवे. पण सोबतच ही भौतिक प्रगतीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक होणे व पर्यावरणीयदृष्ट्या समतोल राहणे अत्यावश्यक आहे. आणि आपली संस्कृती ही अधिकाधिक माणसांना अर्थपूर्ण जीवनाची अनुभूती मिळण्यासाठी व ‘निव्वळ ग्राहक’ न बनता ‘जागरूक नागरिक’ बनण्यासाठी प्रवृत्त करणारी असणे गरजेचे आहे. ‘निर्माण’ हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाउल आहे.

Untitled design (21).jpg

निर्माणच्या रुपाने तरुणांना रचानावादी कामासाठी एक व्यासपीठच मिळाले आहे असे म्हणल्यास वावगे ठरू नये. अनेक तरुणांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा नक्कीच असते. त्याला फक्त योग्यवेळी नेमकी दिशा मिळणे गरजेचे असते. अशासाठी निर्माण सारखा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे.
निर्माणची दहावी बॅच येत्या जानेवारीमध्ये(२०२०)“सर्च,गडचिरोली”येथे सुरू होत आहे.यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यां्नी http://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरून प्रवेशअर्ज डाऊनलोड करावाआणि भरून त्वरित पाठवावा. प्रवेशअर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट, 2019 ही आहे!ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यभरात मुलाखती होऊन ऑक्टोबरमध्येनिवड झालेल्या शिबिरार्थ्यांची यादी जाहीर होईल.

2006 – 2019: निर्माण प्रक्रियेकडे एक नजर –

एकूण शिबिरे – 55
एकूण शिबिरार्थी – 1232
वैद्यकीय विद्यार्थी – 607
इंजिनियरिंगचे विद्यार्थी – 306
महाराष्ट्रातील जिल्हे – 36
एकूण रिसोर्स पर्सन्स – 110
सामाजिक कामात पूर्णवेळ गुंतलेले निर्माणी – ~350
विविध सामाजिक संस्था जिथे निर्माणी काम करतात – ~80
निर्माणींनी दिलेल्या सामाजिक योगदानाचे ‘व्यक्ती-वर्ष’ –~860

अमृत बंग,

निर्माण, सर्च, गडचिरोली – 442605
इमेल – [email protected],

निर्माण विषयी अधिक माहितीसाठी –
Website: www.nirman.mkcl.org/
Facebook: www.facebook.com/nirmanforyouth/
Instagram: www.instagram.com/nirmanforyouth/
Youtube: www.youtube.com/user/Nirmaanites/
निर्माण विषयी नुकताच IDR मध्ये आलेला लेख – https://idronline.org/finding-your-social-purpose/

Leave a Comment