हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदुरीकर महाराजांनी ओझर येथील किर्तनामध्ये ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. हे प्रकरण वाढत असल्यामुळे अखेर सात दिवसानंतर इंदोरीकर महाराजांनी लेखी माफीही मागितली आहे.दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी उडी घेतली आहे.
इंदुरीकर महाराजांकडून कीर्तनामध्ये पौराणिक दाखले देत असताना एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल त्याचं एवढं कशाला भांडवल करता? असा सवाल सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे. तसेच हा वाद विनाकारण वाढवला जात असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सिंधुताईंनी मंगळवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी इंदुरीकर महाराजांबद्दलच्या वादावर त्यांनी आपलं मत मांडलं. ”टीकाकारांनीही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा,” असं मत सिंधुताईंनी व्यक्त केलं.