सोलापुरात एमआयएम-शिवसेनेला पडणार भगदाड? तौफिक पैलवान, महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । सोलापूरच्या राजकारणात आता नवी घडामोड घडताना दिसत आहे.एमआयएमचे तौफिक पैलवान आणि शिवसेनेनेचे महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार असल्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी पक्षांतर केल्यास सोलापुरात एमआयएम आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडणार आहे. हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर गेल्यास सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे.

दोघेही मूळचे काँग्रेसी, पण..
सध्या सोलापूर महापालिकेत विरोधी पक्ष नेते असणारे शिवसेनेचे महेश कोठे अन् एमआयएमचे तौफिक पहिलवान हे दोघेही मूळचे काँग्रेसी. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी ही काँग्रेसला सोडचिट्टी दिली. विशेष म्हणजे, सोलापूर शहर मध्य मधून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कधी काळी त्यांचेच हाडाचे कार्यकर्ते असणाऱ्या तौफिक पहिलवानांनी एमआयएमची पतंग उडवली तर महेश कोठेंनी शिवसेनेच धनुष्यबाण हाती घेतलं. या निवडणुकीत तौफिक पहिलवान दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर कोठे तिसऱ्या क्रमांकावर राहिले अन् प्रणिती शिंदें यांनी सोलापूर शहर मध्य मधून निसटता विजय मिळवला.

2014 ते 2019 च्या निवडणुकीदरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं…
2019 ला सोलापूर शहर मध्य मधून शिवसेनेने महेश कोठेंच तिकीट कापलं आणि एन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून सेनेत प्रवेश करणाऱ्या दिलीप मानेंना उमेदवारी दिली तर तिकडे तौफिक पहिलवान हे पाडगनूर केस प्रकरणात विजापूर तुरुंगात असल्याने फारुख शाब्दी यांना उमेदवारी देण्यात आली. एवढं सगळं होऊन ही प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य मधून आमदारकीची हॅट्रिक साधली.त्यामुळं सर्व समीकरणच बदलून गेली.

दोघांचीही राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत
काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे नेते तौफिक पाहिलवान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या मध्यस्थीने सर्व नऊ नगरसेवकांसह भेट घेतली. तर शिवसेनेचे नेते महेश कोठे यांनी ही शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. जर सोलापूर शहर मध्य मधील हे दोन तगडे गडी राष्ट्रवादीच्या गळाला लागले तर शहरातील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मात्र, शिवसेना नेते महेश कोठे यांनी ‘अद्याप मी पवार साहेबांची भेट घेतली नाही विरोधकांकडून हेतुपुरस्पर अशा बातम्या पेरल्या जातं आहेत’ असं म्हटलं आहे. तर तौफिक पहिलवान हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी अनुकूल असल्याच त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर मध्य मध्ये मोठे राजकीय भूकंप घडवून आणले तर आश्चर्य वाटायला नको.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”