सोलापूर प्रतिनिधी । शहरातील बापूजी नगर परिसरात आणखीन दोन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले असून सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एक्केचाळीस झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच शास्त्रीनगर परिसरातील वृद्ध महिलेचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारीची संशयित रुग्ण म्हणून या महिलेला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज दिवसभरात कोरोना चाचणीचे शंभर रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी अठ्यानव रिपोर्ट निगेटिव्ह असून दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आज मृत्यू झालेल्या शास्त्रीनगर परिसरातील महिलेला वीस एप्रिल रोजी सारीच्या संशयावरून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक्केचाळीस झाली असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सदतीस जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सध्या होम क्वारंटाइनमध्ये पंधराशे पाच व्यक्ती आहेत. इंस्टीट्यूट क्वारंटाइनमध्ये सहाशे तेवीस एवढ्या व्यक्ती आहेत. अद्यापही एकशे सत्यानव व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वॉर्डातील आकराशे चार व्यक्तीपैकी व्यक्तींपैकी नउशे सात जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून आठशे सहासष्ट जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तर एक्केचाळीस जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.