सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई तालुक्यातील ओझर्डे गावाच्या जवानाला सिक्किममध्ये वीरमरण आले आहे. सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) असे जवानाचे नाव असून आज संध्याकाळ पर्यंत मृतदेह ओझर्डे गावी पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिक्कीम येथे बर्फाळ भागात सेवा बजावत असताना वादळी वाऱ्यात सापडून जवान सोमनाथ जखमी झाले होते. त्यानंतर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते शहिद झाले.
सोमनाथ तांगडे हे आपल्या दोन साथीदांरासह बर्फाच्या टेकडीवर सेवा बजावत होते. दि. ८ एप्रलिला पहाटे ३ वाजता वादळी वाऱ्याने व पावसाने झोडपून काढले. त्या वादळी वाऱ्यात जवानांचा तंबू उडून गेल्याने ते तिघे थंडित कुडकुडत बसले होते. तेथे सोमनाथ बर्फावर पडल्याने ते कोमात गेले होते. दि. ८ पासून त्यांच्यावर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये उपचार चालू होते. मात्र शुक्रवारी (दि. १६) त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या निधनाने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव पुण्यापर्यंत विमानाने आणण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. शनिवारी रात्रीपर्यंत सोमनाथ यांचे पार्थिव गावी येवू शकते. गावात सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव येणार असल्याने गावात तसेच भागात अमर रहे जवान असे फलक लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांनी गर्दी करू नये, तसेच कोव्हीडचे नियम पाळावेत असे आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा