कराडची सोळवंडे गँग तडीपार; तेजस्वीनी सातपुतेंची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेली सोळवंडे गँगला तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतचा आदेश काढला असून पद्या सोळवंडेसह सहा जणांना एक वर्षासाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे. कराड तालुक्यात हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या टोळीने गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे सोळवंडे गँगमधील सहा जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला होता. हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होऊन त्यांनी पद्या सोळवंडेसह सहा जणांना एक वर्षासाठी हद्दपार आले. प्रदुम्न उर्फ पद्या दिपक सोळवंडे (वय 25), रोहित रमेश कारंडे (वय 23), मनोज महादेव जाधव (वय 23), विजय शिवाजी घारे (वय 32), अमोल जगन्नाथ भोसले ,वय 34, सर्व रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ, कराड) व ओंकार युवराज थोरात (वय 24, रा. ओंड, ता. कराड) अशी हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील सहा जणांची नावे आहेत.

हद्दपार प्रस्तावाची सुनावणी चालू असलेल्या कालावधीतही या टोळीतील सदस्यांवर गुन्हे दाखल झाल्याने सर्वसामान्य जनतेस त्यांचा उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत होती. याचा विचार करून कराड तालुका हद्दीत घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 48 तासाच्या आत संशयितांनी कराड तालुका हद्दीबाहेर गेले पाहिजे, असेही तेजस्वी सातपुते यांनी आदेशात म्हटले आहे. या कारवाईमुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात. समाजात दहशत पसरविणार्‍या गुंडांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे असे मत तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केले.