पिंपरी गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मृतदेह कार्यालयात आणू : सुहास बोराडे

कराड | कराड तालुक्यातील पुनर्वसित पिपरी गावाला स्वतंत्र स्मशानभूमी नाही. शेजारच्या गावातील स्मशानभूमीत मृतदेह अंत्यविधीसाठी नेल्यास विरोध केला जातो. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावच्या स्वतंत्र स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मृतदेह तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आणून ठिय्या देऊ, असा इशारा पंचायत समिती सदस्य सुहास बोराडे यांनी दिला.

कराड येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी दि. 12 रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. तसेच गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सदस्य देवराज पाटील, नामदेव पाटील, सुरेखा पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सभेमध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा दिला. त्यामध्ये ग्रामपंचायत विभागाचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी सदस्य सुहास बोराडे यांनी पुनर्वसित पिपरी गावातील प्रलंबित स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित केला.

सुहास बोराडे म्हणाले, पुनर्वसित पिपरी ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी अद्याप प्रलंबितच आहे. गावात स्मशानभूमी शेड नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी करावा लागतो. रात्री-अपरात्री व पावसाळ्याच्या दिवसात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच अशावेळी शेजारच्या गावातील स्मशानभूमीत मृतदेह अंत्यविधीसाठी नेल्यास त्यांच्याकडून विरोध दर्शवला जातो. त्यानंतर वेळप्रसंगी प्रशासनाकडून सरपंचांना सांगितल्यास अनुमती दिली जाते. परंतु, यासगळ्यात ग्रामस्थांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गावाचा स्वतंत्र स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. अन्यथा, पुनर्वसित पिपरी ग्रामस्थांसह मृतदेह तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आणून ठिय्या देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावर गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सदरचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आरोग्य विभागाच्या आढाव्यावेळी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दुषित आले असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संबंध्त अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच आरोग्य विभागाची घरोघरी कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असून त्यानुसार गावागावामध्ये ज्यांनी अद्यापि पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही, अशांची माहिती घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

घरकुल योजनेचा फेर सर्व्हे करावा : नामदेव पाटील

दरम्यान, सुहास बोराडे यांनी घरकुलांचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या 15 वर्षांपासून काही गावातील बेघर लोकांची नावे यादीत येऊनही त्यांना अद्यापि लाभ मिळालेला नाही. घरकुल मंजूर होऊनही केवळ त्यांची जागा नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची परिस्थिती त्यांनी विषद केली. यावर गटविकास अधिकारी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी ज्यांचा घरकुल योजनेचा सर्व्हे झालेला नाही, त्यांचा फेर सर्व्हे करण्याचा ठराव घेण्याची मागणी सदस्य नामदेव पाटील यांनी केली.

You might also like