जोहान्सबर्ग । दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी पहिल्यांदाच कबूल केले की, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमधील मतभेदांमुळे, गुप्ता कुटुंबावर योग्य कारवाई होऊ शकली नाही, जे कथितपणे देशातील घोटाळ्यात सामील आहेत. सरकारी संस्था आणि प्रांतीय सरकारमधील कोट्यवधी रॅंड्सचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या तीन गुप्ता बंधूंशी माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांच्या संबंधांचा उल्लेख करताना रामाफोसा म्हणाले, “त्यांनी व्यवस्थेत अत्यंत व्यवस्थित घुसखोरी केली होती. त्यांना स्वीकृती होती, त्यांची पोहोच होती. त्याविषयी चेतावणीही दिली गेली होती मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही.”
गुरुवारी चौकशी आयोगासमोर साक्ष देताना रामाफोसा म्हणाले की,”पक्षाच्या काही सदस्यांनी या लिंकबद्दल पक्षाला इशारा दिला होता. “एक चेतावणी दिली गेली होती आणि सतर्क राहण्याची गरज होती. मात्र मला वाटते की, गुप्ता कुटुंबाच्या बाबतीत आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती कारण आम्हाला वाटले की, ते आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचे मित्र आहेत.”
रामाफोसा म्हणाले की,”परिवहन मंत्री फिकिले मबौला यांनी याबाबत राष्ट्रीय कार्यकारी समितीला अनेक वेळा सांगितले होते.” इतर अनेक माजी मंत्र्यांनीही आयोगासमोर साक्ष दिली आहे. रामाफोसा यांनी गुप्ता कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतातून पाहुण्यांना घेऊन जाणारे विमान हवाई दलाच्या वॉटरक्लूफ तळावर उतरले या घटनेचाही उल्लेख केला.
गुप्ता कुटुंब दुबईमध्ये हद्दपार आहेत आणि दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांनी येथे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी 1994 मध्ये देशाची पहिली लोकशाही स्थापन केल्यानंतर गुप्ता बंधू – अजय, अतुल आणि राजेश – त्यांच्या कुटुंबियांसह येथे आले.