मुंबई । भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं. पण भारतीय हवामान खात्याने ही माहिती फेटाळली होती. अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं.
तर दुसरीकडे राज्यातही पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि उर्वरित राज्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कोकणसह राज्यातील विविध भागात पूर्व मोसमी पाऊस कोसळणार आहे.
आयएमडीने १ जूनला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर २ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. तर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.
चक्रीवादळाचा धोका
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Southwest monsoon hits Kerala: IMD
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”