मुंबई । राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर आदित्य ठाकरेंविरोधात सपाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार घोषणाबाजी केली, मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले.
यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाहीत, साधा फोनही उचलत नाही. आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाही. त्यामुळे नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचंही आझमी यांनी सांगितले.
अबू आझमी यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरच्या निकालावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आजचा दिवस पुन्हा एकदा भारतासाठी काळा दिवस आहे. बाबरी मशीद 1528 मध्ये बनवण्यात आली होती. 1949 मध्ये जबरदस्तीने मशिदीत मूर्ती ठेवण्यात आली. 1992 मध्ये ही मशीद पाडण्यात आली. हे सर्व जगाने पाहिलं आहे. जेव्हापासून केंद्रात मोदी सरकार आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, आयटी, पोलीस या संस्थांना केवळ खेळणं बनवून टाकलं आहे. अयोध्या जमिनीच्या प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मशीद पाडण्यात आली आणि तेथे मुर्ती ठेवण्यात आली हे चुकीचं झाल्याचं म्हटलं.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.