लढा कोरोनाशी । १९१८ साली जगाला स्पॅनिश फ्लूने हैराण केले होते. कोरोना सारखाच तो हि एक साथीचा आजार होता. असे बोलले जाते कि स्पॅनिश फ्लूने जगातील २७ टक्के लोकसंख्येला बाधा केली होती. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार ५० करोड जणांना लागण झालेल्या स्पॅनिश फ्लू ने ५ करोड जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एकूण १ करोड २० लाख भारतीय होते. स्पॅनिश फ्लूच्या साथीने तेव्हा सर्व देशभरातील सामाजिक फूट पाडण्यासाठी साथीच्या रोगांचा कसा प्रभाव पडतो हे दाखवून दिले होते.
मुंबईच्या बंदरावरील पोलीस शिपाई फ्ल्यू चा पहिला रुग्ण ठरला होता
भारतीय सैन्य घेऊन जाणारे एक जहाज २९ मे १९१८ या तारखेला मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते सुमारे ४८ तास शहराच्या बंदरावर तरंगत होते. जग पहिल्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यावर होते, त्यामुळे मुंबईतील बंदरे इंग्लंडमधून आलेल्या सैन्य आणि वस्तूंची उठाठेव करण्यात व्यस्त असत. यामुळे २९ मे ला आलेल्या या जहाजाकडे बंदरावरच्या कोणाचेच लक्ष न्हवते. आणि यातूनच पश्चिम समुद्र किनाऱ्याहून H1N1 influenza virus म्हणजेच स्पॅनिश फ्लू चा भारतात प्रवेश झाला.
भारतात १ करोड ८० लाख जणांचा जीव गेला
१० जून रोजी ७ पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतील दवाखान्यात भरती करण्यात आलं. त्यांच्यात स्पॅनिश फ्लूची लक्षण आढळल्याने सर्वांना धक्का बसला. फ्लू झालेल्या ७ पोलीस शिपायांपैकी एकजण बंदरावर ड्युटीला होता. जगभर वाऱ्यासारखा पसरत असलेल्या स्पॅनिश फ्लूचे ते ७ जण भारतातील पहिले रुग्ण होते. त्यानंतर फ्ल्यू मुंबई शहरात पसरला आणि मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वेनमुळे तो पाहता पाहता देशाच्या कानाकोपऱ्यात गेला. १९२० पर्यंत स्पॅनिश फ्लूने एकूण १ करोड ८० लाख भारतीयांचा जीव घेतला. भारताच्या तेव्हाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६ टक्के लोकसंख्या स्पॅनिश फ्लूने खाऊन टाकली. जगात १९२० पर्यंत ५ करोड जणांचा स्पॅनिश फ्लूने मृत्यू झाला होता. हा आकडा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा अधिक होता.
स्पॅनिश फ्लू च्या तीन लाटा पाहायला मिळाल्या, तिसरी लाट जास्त विद्वंसक ठरली
स्पॅनिश फ्लू जगभर वेगवेगळ्या लाटांमध्ये पसरल्याचे पाहायला मिळाले. पहिली लाट सामान्यत: सौम्य होती. स्पॅनिश फ्लूची ही लाट जुलैपर्यंत टिकली. त्यानंतर, दुसरी आणखी एक प्राणघातक लाट आली, जी सप्टेंबरमध्ये सुरू झाली आणि १९१८ वर्षाच्या शेवटपर्यंत चालली. १९१९ च्या सुरुवातीच्या महिन्यांत स्पॅनिश फ्लूची अंतिम लाट आली आणि मार्च १९२० मध्ये स्पॅनिश फ्लू नाहीसा झाला.
आणि एकाच दिवसात मुंबईत ७६८ लोक मरण पावले
शिमलाच्या टेकडीवरील टेकड्यांपासून ते बिहारच्या एकाकी खेड्यांपर्यंत, देशाचा कोणताही भाग स्पॅनिश फ्लू पासून स्वतःला वाचवू शकला नाही. मुंबईत ६ ऑक्टोबर १९१८ रोजी एकाच दिवसात ७६८ लोक मरण पावले. हिंदी कवी सूर्यकांत त्रिपाठी, ज्याला निराला म्हणून ओळखले जाते, त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे की, “गंगा मृतदेहांनी सुजली होती.” फ्लूमुळे त्याने आपली पत्नी व आपल्या कुटुंबातील बरेच सदस्य गमावले परंतु शेवटचा संस्कार करण्यासाठी त्यांना पुरेसे लाकूड सापडले नाही. त्यानंतर काही महिन्यांतच गंगेसोबत भारतातील सर्वच नद्या मृतदेहाने सुजल्या.
जगण्याची सर्व आवड संपली होती – गांधी
महात्मा गांधीजींचे नेतृत्व तेव्हा नुकतेच उभारी घेऊ लागले होते. बुद्धिवाद्यांना त्यांच्यात भावी नेता दिसू लागला होता. मात्र गांधींनासुद्धा स्पॅनिश फ्लू ने चिंताग्रस्त केले होते. पुढे गांधींनी आपल्या आत्मचरित्रात स्पॅनिश फ्लू बद्दल लिहिताना म्हटले आहे, “जगण्याची सर्व आवड संपली होती.”
ब्रिटनपेक्षा भारतात मृत्यू दर जास्त
विविध कारणांमुळे, स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट भारतासाठी अधिक प्राणघातक ठरली. ब्रिटनमधील साथीच्या रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दर १,००० लोकांपैकी ७.७ होते, तर भारताचा मृत्यूदर दर १००० लोकांमध्ये २० वर पोहोचला होता. यामध्ये देशातील गरीब आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. भरीत भर म्हणून १९१८ साली भारतात स्पॅनिश फ्लू च्या जोडीला भीषण दुष्काळ पडला. यामुळे अन्न धान्याचा तुटवडा पडला आणि भूकमारी होऊ लागली. कमी आहारामुळे लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आणि त्यामुळे फ्ल्यूची लागण झाल्यावर मरणाऱ्यांची संख्या वाढली.
पुरुषांपेक्षा फ्युने स्त्रियांचा अधिक बळी घेतला
भारत हा एकमेव असा देश आहे जेथे स्पॅनिश फ्लूने सर्व वयोगटातील पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया मरण पावल्या. तसे का झाले हे स्पष्ट करणे कठीण आहे. मात्र स्त्रियाचा आहार पुरुषांपेक्षा कमी राहिल्याने फ्ल्यू मुळे महिलांचे जास्त मृत्यू झाले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. जेव्हा अन्नाची मर्यादा असेल तर पुरुषांना प्राधान्य दिले जात असे. त्यामुळे महिला कुपोषित राहिल्या आणि स्पॅनिश फ्लूच्या शिकार झाल्या.
हरिजनांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त
लिंगासोबतच स्पॅनिश फ्लू ने बाधित झालेल्यांची समुदायनिहाय मांडणी करणेही गरजेचे आहे. माणसाचा जन्म कुठे झाला आणि तो किती श्रीमंत आहे यावर तो स्पॅनिश फ्लूमधून वाचणार कि मारणार याचा अंदाज बांधता येत होता. समाजातील प्रत्येक फ्ल्यू बाधित १ हजार खालच्या जातीच्या हिंदूंमागे ६१ खालच्या हिंदूंचा मृत्यू झाला तर समाजातील प्रत्येक १ हजार फ्ल्यू बाधित साधारण हिंदूंच्या मागे १८.९ टक्के जणांनी आपले प्राण गमावले. तर भारतात राहणाऱ्या युरोपियनांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ ८. टक्के होते. भारतातील हरिजन समाज प्रामुख्याने स्वच्छतेच्या कामात असल्यामुळे त्यांच्यात मृत्यू दर जास्त असल्याचे बोलले जाते.
फ्ल्यूमुळे भारतीयांच्या एकी निर्माण झाली आणि त्याचा फायदा स्वातंत्र्य लढ्याला झाला
स्वातंत्र्यपूर्व काळात आलेल्या या फ्ल्यूने वाईट अनुभवांसोबतच काही दीर्घकाळ टिकणारे परिणामही सोडले. ब्रिटिश सरकार फ्लयूशी दोन हात करण्यात सपशेल फेल गेले. यामुळे देशभर वेगवेगळ्या कारणांसाठी स्थापन झालेल्या विविध स्थानिक आणि जातीय संघटनांनी एकत्रित येत मदतकार्य करण्यासाठी पावले उचलली. या तळागाळातील संघटनांना फ्लूने एकाच कारणासाठी देशभर एकत्र केले. एकूणच काय तर फ्लयूशी लढत लढत भारतीयांची एकी वाढली. आणि यातून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रोत्साहन मिळाले.