औरंगाबाद : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने लवकी कासोडा गावात पत्त्यांच्या क्लबवर छापा मारून ९ जुगा-यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दुचाकी व चार चाकी वाहने, मोबाईल असा १४ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भागातील आलिशान पत्त्याच्या क्लबवर जुगार खेळला असल्याची माहिती पोलिसांना मिळतास सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, नाईक, सय्यद शकील, इम्रान पठाण, अनिल खरात, विखनकर आदींच्या पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून छापा मारला. यावेळी तेथे १५ ते २० जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत होते. तर जुगा-यांच्या सेवेसाठी तेथे अनेक जण कार्यरत होते, लाईट जाऊ खंड पडू नये, यासाठी विशेष इन्व्हर्टरची व्यवस्था करण्यात आली होती.
या जुगा-यांना महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या पुरविल्या जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिसांच्या पथकाने तात्काळ या ठिकाणी धाड टाकली व मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्याठिकाणी असलेले अनेक जुगारी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. मात्र या घटनेमुळे अवैध पत्त्यांचे क्लब चालवणा-या क्लब मालकांचे धाबे दणाणले असून, वाळूज एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.