नवी दिल्ली । लॉकडाऊनचा कालावधी वाढवत शहरात अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही पोहोचवण्यासाठी रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोफत श्रमिक रेल्वे गाड्या चालवल्या आहेत. आता रेल्वेनं त्याहीपुढे एक पाऊल टाकलं आहे. लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. या विशेष रेल्वेसाठी सोमवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन तिकीट बुकींग होणार आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. ज्या व्यक्तीत करोनाची कोणतीही लक्षणं आढळणार नाहीत केवळ त्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. जर तुम्हीही या रेल्वेचं बुकींग करणार असाल तर खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल..
कुठल्या ठिकाणांसाठी तिकीट बुक करता येईल?
पहिल्या दिवशी १२ मे रोजी राजधानी दिल्लीतून एकूण १५ रेल्वे प्रवासासाठी निघतील. १५ ठिकाणांच्या पहिल्या टप्प्यात नवी दिल्ली ते दिब्रुगढ (आसाम), आगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतरपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवीसाठी या विशेष रेल्वेचं संचालन होईल.
कुठं आणि कसं बुक करता येईल तिकीट?
पहिल्या टप्प्यात तिकीट बुकींग आज (सोमवार) सायंकाळी ४ वाजेपासून सुरू होईल. प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून किंवा अपवरून हे बुकींग करावं लागेलं. (https://www.irctc.co.in/) रेल्वे स्थानकांवरील काउंटर वरून कुठल्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही. इंडिव्हिज्युअल युझरच्या अकाऊंटवरूनच हे तिकीट बुक केले जाऊ शकतील. यासाठी एजंटमार्फत तिकीट मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
तिकिटासाठी किती भाडं आकारालं जाईल?
या विशेष रेल्वेसाठी राजधानी रेल्वे प्रमाणे तकीट भाडं आकारणी होईल. या सर्व रेल्वेमध्ये एसी कोच लावण्यात आलेले आहेत. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांना एसी तिकिटाचे पैसे मोजण्यासाठी तयार राहावं लागेल. विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवास करताना या गोष्टींची नोंद नक्की घ्या?
या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये पॅन्ट्री कारची सुविधा नसेल. आपल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी या गाड्या सीमित रेल्वे स्टेशनवर थांबतील. सोबतच रेल्वे प्रवासात प्रवासी कोरोनापासून दूर राहतील, याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी मास्क परिधान करणं आवश्यक राहील तसंच रेल्वे प्रवासाअगोदर स्वास्थ्य ठिक असेल तरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा तिकीट असेल तरीही परवानगी नाकारली जाईल. दरम्यान, मजूर, कामगार आणि इतर गरजवंतांसाठी श्रमिक विशेष रेल्वे अगोदर प्रमाणेच सुरू राहतील. या रेल्वने प्रवास करताना मजुरांकडून कोणत्याही प्रकारे भाडं न आकारता त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडलं जाईल. मात्र, इतर प्रवाशांना राजधानी दिल्लीतून निघालेल्या एकूण १५ रेल्वे प्रवासासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”