नवी दिल्ली । सणासुदीचा हंगाम आला आहे. नवरात्र ते दसरा, दीपावली आणि भाई बीज पर्यंत पुढील सलग दोन महिने फक्त सणच सण आहेत. सण म्हणजे पूजा करणे, घर सजवणे, लोकांना भेटणे यासह भरपूर खरेदी आणि या सणासुदीच्या खरेदीसाठी बाजार देखील सज्ज झाले आहे. ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आणि बँका नवंनवीन ऑफर्स लाँच करत आहेत जेणेकरून या दसरा किंवा दिवाळीला तुमच्या खरेदीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये.
दीर्घकाळापर्यंत पसरलेल्या कोरोना महामारीनंतर या दिवाळीसंदर्भात सामान्य माणसासह बाजारपेठा आणि बँकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सणांचा हंगाम जवळ येताच बँका विविध प्रकारचे नवीन क्रेडिट कार्ड लाँच करत आहेत. सणासुदीच्या खरेदीचा बोजा थेट तुमच्या खिशावर पडू नये म्हणून बँका त्यांच्या ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठ्या ऑफर्ससह क्रेडिट कार्ड लाँच करत आहेत.
एसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक सारख्या मार्केट लीडर व्यतिरिक्त, त्या बँका देखील नवीन कार्ड लाँच करत आहेत ज्यांनी आतापर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर केले नव्हते. आता त्या बँकाही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन बाजारात दाखल होत आहेत. अनेक बँकर्स त्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यांची मोठी हिस्ट्री आहे.
कोचीच्या खाजगी फेडरल बँकेने गेल्या महिन्यात क्रेडिट कार्ड व्यवसायाच्या जगात प्रवेश केला तो देखील कार्ड नेटवर्क ‘व्हिसा’ द्वारे. काही दिवसांनंतर फेडरल बँकेने घरगुती कार्ड नेटवर्क RuPay सह नवीन क्रेडिट कार्ड लाँच केले. बँकांनी आपले लक्ष भारतातील तरुण लोकसंख्येकडे केंद्रित केले आहे आणि तरुणांना क्रेडिट कार्डाशी जोडण्यासाठी नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले जात आहेत. बँकांचा असा विश्वास आहे की, आपली युवा पिढी भरमसाठ खर्च करतात. भारतातील तरुण जितके त्यांच्या उत्पन्नाबाबत गंभीर आहे, तितका खर्च करायला देखील ते मागेपुढे पाहत नाही.
वित्तीय सल्लागार सर्विस सेक्टरमधील दिग्गज कंपनी PwC India च्या मते, भारत पारंपारिकपणे डेबिट कार्डची बाजारपेठ आहे. मात्र, गेल्या दशकात क्रेडिट कार्ड्सच्या वाढत्या मागणीमुळे ही वस्तुस्थिती बदलली आहे. आता क्रेडिट कार्डचा मुक्तपणे वापर केला जात आहे. लोकांना क्रेडिट कार्डचे महत्त्व समजले आहे. वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सेवा आणि नवीन उत्पादने देत आहेत, यामुळे लोकांचा कलही क्रेडिट कार्डांकडे वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, जुलैच्या अखेरीस देशातील क्रेडिट कार्डांची संख्या 63.4 कोटीने ओलांडली होती.