नवी दिल्ली । भारताभोवती दिवसागणिक कोरोनाचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते आता ४२.४ टक्क्य़ांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१३ देशात कोरोना व्हायरस या महामारीने विळखा घातला आहे. जगात आतापर्यंत ५७ लाख ८९ हजार ८४३ जणांना संसर्ग झाला आहे. तर तीन लाख ५७ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत २४ लाख ९७ हजार ६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतात जुलैच्या सुमारास करोना विषाणूची शिखरावस्था गाठली जाऊन मृतांची संख्या १८ हजारापर्यंत जाऊ शकते, असे साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसेच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, अजूनही करोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. भारतातील कोरोनाची साथ जुलैत शिखरावस्थेत राहील व तेव्हा भारतातील बळींची संख्या १८ हजार असू शकते. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहेत त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या चार ते सहा लाख राहील त्यात मृत्युदर तीन टक्के राहील. त्यामुळे अंदाजे १२ ते १८ हजार बळी जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”