हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने या प्रकरणावरून अदानी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच केंद्र सरकारला यासाठी जबाबदार धरत आहेत. याप्रकरणी जेपीसी समिती गठीत करण्याची मागणी विरोधकांनी केली असतानाच मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र याला विरोध केल्याने महाविकास आघाडी मधेच मतभेद दिसून आले. त्यामुळे अदानी प्रकरणावरून महाविकास आघाडी मधे फूट तर पडणार नाही ना अशा चर्चा सुरु आहेत. याचबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार याना विचारलं असता त्याची स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
अजित पवार आज सातारा दौऱ्यावर असून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर रोखठोक पद्धतीने भाष्य केलं. अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट पडू शकते का असा सवाल केला असता महविकास आघाडीत फूट का पडेल ? असा उलट सवाल अजित पवारांनी केला. महाविकास आघाडीचा आणि फूट पडण्याचा काय संबंध? जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत तोपर्यंत कोणतीही फूट पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/231713629404662/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR
जस या देशात टाटा- बिर्ला यांनी पाया रचला आणि कित्येक लोकांना रोजगार दिला त्याचप्रमाणे अंबानी आणि अडाणी यांनी काम केलं आहे. आणि अडाणी यांच्या प्रकरणात समिती नेमण्यात येईल असं यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्यामुळे याप्रकरणी काय ते समोर येईलच असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्यावारीवरूनही अजित पवारांनी निशाणा साधला. ज्याला देवदर्शनाला जायचं आहे त्यांनी आनंदाने जावं. आम्ही पण अनेक ठिकाणी देवदर्शनाला जातो पण कधी आम्ही सांगत पण नाही. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो. आमच्या वडिलधाऱ्यांनी आमहाला महापुरुषांचा सन्मान करायला शिकवलं आहे . फक्त त्या जातीचा, धर्माचा, पंतांचा वापर माणसामाणसांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी कोणी करू नये असं अजित पवार यांनी म्हंटल.