परभणी प्रतिनिधी । जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुले आणि मुलींसाठी परभणी येथील समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज परभणी येथे दिव्यांग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावना नखाते यांच्या हस्ते शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनावर या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेला जिल्हाभरातील दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये २०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वसामान्य स्पर्धकांप्रमाणे धावणे, गोळाफेक आदी मैदानी क्रीडा प्रकारासोबत तीनचाकी सायकल रेस यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये दिव्यांग स्पर्धक हिरीरीने सहभाग नोंदवत आहेत. या स्पर्धांना पालक , नातेवाईक आणि प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.