Satara News : एसटी- दुचाकीची अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; 15 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील वडूज – पुसेगाव रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुरकवडी गावानजीक पुण्यावरून वडुजला जाणारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एसटीमधील 15 जण जखमी झाले. एसटी दुचाकीला धडकून सर्व्हिस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. एसटीने दिलेल्या धडकेत झाड मोडून पडले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वडूज आगाराची एसटी बस क्रमांक ( MH 06 S8175) ही पुण्यावरून वडुजला निघाली होती. खटाव गावच्या पुढे आल्यावर भुरकवडी गावानजिक एका वळणावर कॅनॉलच्या नजीक समोरुन आलेल्या दुचाकी क्रमांक ( UK05A 5559) ला धडक देऊन ही बस थेट झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एसटी मधील लोक गंभीर जखमी झाले.

https://fb.watch/nyFPJzLwrY/?mibextid=Nif5oz

 

या बसमध्ये साधारण 15 लोक प्रवास करत होते. बसमधील प्रवाशी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून जखमींना इतर प्रवाशांनी अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून वडुजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली असून अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.