हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोयीस्कर प्रवासी पर्याय म्हणजे ST . तसेच ग्रामीण भागासाठी सर्वात महत्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लाल परी. STमहामंडळाच्या गाड्या प्रवाश्यांना सोयी सुविधा देतातच मात्र सणासुदीच्या काळातही या सोयी अधिक वेगाने मिळतात. त्यामुळे गर्दी कितीही असो लोक ST नेच प्रवास करणार. त्याचेच फळ म्हणजे सणासुदीच्या काळात अमरावती विभागात ST ने 6 कोटी रुपयाचे उत्त्पन्न मिळवले आहे.
11 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत केली ही कमाई
अमरावती जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार असे एसटी महामंडळाचे एकूण आठ आगार आहेत. या आगारातून ग्रामीण आणि शहरी भागासाठी तसेच इतर लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी गाड्या सोडल्या जातात. तसेच शहराचे वाढते नागरीकरण वाढल्यामुळे या भागांतून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. यामुळे एसटी महामंडळाने जिल्ह्यात 11 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत तब्ब्ल 6 कोटी 8 लाख 91 हजार रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे.
आठ बसस्थानकावरून सोडण्यात आल्या अतिरिक्त बस
दिवाळीच्या तोंडावर होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करत जिल्ह्यातील आठ बसस्थानकावरून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. ज्या दिवाळीपूर्वी 40 होत्या त्या दिवाळीनंतर 60 झाल्या. तसे महामंडळाचे नियोजन होते. त्यामुळे या दिवाळीत एसटीला 6 कोटीचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये परतवाडा आगारातून सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसून आले. या आगारातून 1 कोटी 47 हजार 469एवढा फायदा झाला आहे. अमरावती बसस्थानकाने 96 लाख 87 हजार 399 रूपयांची कमाई केली आहे.
कोणत्या बसेसचा होता समावेश?
अमरावती जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या गाड्यांमध्ये साध्या बसेससह निमआराम, शिवशाही आणि आठ स्लीपर बसेसचा देखील समावेश होता. त्यामुळे एसटी महामंडळाने आठही बसस्थानकातून अतिरिक्त बसेस सोडल्या. त्यामुळे एसटी महामंडळास याचा चांगला फायदा झाला आहे.
एसटीच्या सुविधेमुळे वाढतेय प्रवाश्यांची संख्या
एसटी महामंडळाने महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सुविधेमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्टया आणि सणासुदीच्या काळात गावी जाण्यासाठी व इतर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी एसटीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे 68 लाख 25 हजार रूपयांचे उत्पन्न अमृत ज्येष्ठ नागरिक व 1 कोटी 36 लाख रूपयांचे उत्पन्न महिला प्रवाशांकडून एसटी महामंडळाला झाले आहे.