हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ST Employees। महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. ST कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७% वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना नवीन आरोग्यसेवा पर्याय आणि विमा संरक्षण देण्यात आलं आहे तसेच निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची १२ महिने मोफत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे तिन्ही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1) 87000 ST कर्मचाऱ्यांना फायदा –
यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employees) महागाई भत्ता हा ४६% होता, त्यात आता ७ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता तो ५३% पर्यंत वाढला आहे. हा सुधारित महागाई भत्ता जून २०२५ पासून लागू होईल. 2018 पासून थकीत असलेला महागाई भत्ता अखेर जाहीर झाल्याने जवळपास ८७,००० एसटी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
2) नवीन आरोग्यसेवा सेवा आणि विमा संरक्षण- ST Employees
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तर झालीच आहे, परंतु दुसरीकडे त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी कोणत्याही एका आरोग्य योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यासाठी १ कोटी रुपयांचा अपघाती विमाही काढण्यात येईल. एकप्रकारे एक कोटी रुपयांचं सुरक्षा कवच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं.
3) मोफत एसटी प्रवासाचा कालावधी वाढवला-
निवृत्त MSRTC कर्मचारी आणि त्यांच्या पती/पत्नी इथून पुढे १२ महिने म्हणजे संपूर्ण वर्षभर मोफत प्रवासाचा लाभ घेऊ शकणार आहेत. यापूर्वी हा मोफत प्रवास फक्त ९ महिन्यांकरिता होता, मात्र यात आणखी ३ महिन्याची वाढ केल्याने राज्यभरातील सुमारे ३५,००० निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
एसटी कर्मचारी (ST Employees) संघटनांनी वेळोवेळी आपले प्रश्न आणि मागण्या शासनापुढे ठामपणे मांडल्या आहेत. महागाई भत्ता थकीत असणे, पगार वेळेवर न मिळणे, आणि वैद्यकीय सुविधांची अपुरी अंमलबजावणी या बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत होता, मात्र आता महागाई भत्त्यात वाढ झाल्याने एसटी कर्मचारी खुश झाले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल.




