हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. अखेर एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री परब यांनी आज मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते.