हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेल्या विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने दिलेल्या अन्य मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढला जाईल तसंच कामावर त्वरीत रूजू होणाऱ्या संपकरी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती व बदली या सारख्या सर्व कारवाया मागे घेतल्या जातील असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी एसटीचा संप मागे घेत असल्याची घोषणा करत कामगारांनी कामावर रूजू होण्याचे आवाहन केले.
संप मागे घेतल्याने कर्मचारी कामावर परततील. तसेच, सेवा पूर्ववत होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे. दरम्यान, संघटनेने संप मागे घेतला असला तरी, आझाद मैदानात आंदोलनास बसलेले कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण संपातून माघार घेणार नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.