औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद सिडको, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, सोयगाव या आगारातील कर्मचाऱ्यांनी काल सकाळपासूनच काम बंद आंदोलन केले होते. तर दुपारी दोन वाजे नंतर मध्यवर्ती बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी असल्याचा इशारा देत मध्यवर्ती बस स्थानका समोर ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या संधीचा फायदा घेऊन खासगी वाहनांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले होते. मात्र, नाईलाज असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागला. दरम्यान ज्या प्रवाशांनी पुण्यासाठी आगाऊ बुकिंग केले आहे त्यांच्यासाठी मात्र एसटीने बससेवा उपलब्ध करून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसटीला साडे चोवीस लाखांचा तोटा –
औरंगाबाद विभागातून जवळपास 550 एसटी बसेस राज्यातील तसेच राज्याबाहेर विविध मार्गावर धावतात. दररोज जवळपास 1 लाख 51 हजार 16 किलोमीटरचे अंतर कापत 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देतात. या दरम्यान लाखो प्रवासी विविध मार्गावर प्रवास करतात. मात्र काल काही आगारात सकाळपासूनच तर काही ठिकाणी दुपारनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत बस गाड्या आगार आतच उभ्या ठेवल्या. यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास 95 हजार किलोमीटरचे अंतर रद्द करावे लागले. तर रविवारी दिवसभरात एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला 24 लाख 64 हजार 99 रुपयांचा उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.