सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मोती चौकातील छत्रपती प्रतापसिंह मंडळ व सदर बझारची भारत माता या दोन्ही दुर्गादेवींची ऐतिहासिक भेट पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय सातारच्या मुख्य रस्त्यावर एकवटला होता. दरवर्षी रात्री 11 ते 12 या दरम्यान होणारी ऐतिहासिक दुर्गादेवींची भेट गर्दीमुळे लांबल्याने ही भेट चक्क पहाटे 3 च्या सुमारास झाली. दोन वर्षानंतर ही भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने चेंगरा चेंगरी झाली. यामध्ये तीन महिला भाविकांचा श्वास गुदमरून बेशुद्ध पडल्या होत्या. सुदैवाने इतर भाविकांच्या मदतीने बेशुध्द महिलांना गर्दीतून बाहेर काढण्यात आले.
साताऱ्यात यावर्षी भाविकांची मोठी गर्दी असल्याने देवीच्या भेटीला उशिरा झाला. कन्या शाळा ते पोस्ट ऑफिस रस्त्यावर चांगलीच गर्दी जमली होती. या गर्दीमुळे चेंगरा चेंगरा सुरू झाल्याने पोलिसांनी देखील ही गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पहाटे 3 वाजता ही ऐतिहासिक भेट संपन्न झाली. दरवर्षी पेक्षा यंदा भाविक मोठ्या संख्येने ही भेट पाहण्यासाठी उपस्थित होते.
गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण वाढला होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मनाचा या दुर्गा देवींची ऐतिहासिक भेट सातारा पोलिसांनी घडवून आणली. भेट झाल्यानंतर हजारोंचा जनसमुदाय अवघ्या काही मिनिटांत बाजूला झाला. या रस्त्यावर गर्दीत सापडलेल्या अनेक भाविक भक्तांच्या चपल्यांचा खच रस्त्यावरच पडलेला पहायला मिळाला.