औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे शाळा महाविद्यालय, दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सर्वच बंद ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून ठराविक वेळ काळानुसार दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सुरु करण्यात आले होते. सध्या शनिवार रविवार मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. आता सण उत्सव सुरु होत असून मार्केट बाजारपेठ पूर्णवेळ आणि शनिवार रविवार सुरु करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वर्गांकडून करण्यात येत आहे.
कोरोना महामारीचा धोका कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते पण त्यामध्येही रविवार आणि शनिवार मार्केट बंद ठेवण्यात आले. ज्या दिवशी सर्वात जास्त खरेदी केली जाते. त्याचदिवशी मार्केट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आतापर्यंत शनिवार आणि रविवार बंद असल्याने व्यापारी वर्गाचे दहा ते पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आता सण उत्सव सुरू होणार असून या काळात तरी शनिवार आणि रविवार पूर्णवेळ मार्केट सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, राकेश सोनी, विकास साहूजी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरीसिंह, तनसुब झांबड, जयंत देवळानकर, विजय जैस्वाल, अजय शहा यांनी केली आहे.