कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्याबरोबर केंद्रीय कर्मचारी, निवृत्त वेतनधारक, लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या स्वास्थ्य योजनेतंर्गत वेलनेस सेंटर सुरू करावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे.
याबाबत खा. श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहले असून त्यात म्हटले आहे, कोरोना महामारीच्या काळात माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना अपुऱ्या केंद्र सरकारच्या सहाय्यभूत आरोग्य सेवांमुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले आहे. सध्या पुण्यात सी.जी.एच.एस. सुविधा आणि वेलनेस सेंटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तेथील वेलनेस सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागत आहे. मात्र प्रवासासाठी लागणारा वेळ आणि शारीरिक त्रास यामुळे माझ्या भागातील कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना पुणे येथे प्रदान केलेल्या सेवांचा लाभ घेणे कठीण होत आहे.
सातारा जिल्ह्यात एक सी.जी.एच.एस. वेलनेस सेंटर स्थापन करण्याची खरी गरज आहे. ते सुरू झाल्यास सातारा जिल्हा आणि नजीकच्या सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेले सेवारत केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक, लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होईल. यासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स यात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. तर असे सी.जी.एच.एस. वेलनेस सेंटर सुरू करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. तरी सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणखी बळकट करण्यासाठी जिल्ह्यात सी.जी.एच.एस. वेलनेस सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.