खटाव | कोरोनामुळे अवघे ग्रामीण तसेच शहरी भागातील जनजीवन ढवळून निघालेले आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील पुसेसावळी व काशिळ याठिकाणी रुग्णांचे होणारे हाल रोखण्यासाठी तात्काळ कोरोना केअर सेंटरची निर्मिती करणे आवश्यक आहे. तरी पुसेसावळी व काशिळ येथे शासनाने तात्काळ कोरोना सेंटर सुरू करावे. अन्यथा काशीळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर ५ मे रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते धैर्यशील कदम यांनी दिलेला आहे.
लोकांना दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात प्रशासकीय यंत्रणा लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना मोठया प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुसेसावळी गाव हे जवळपास दहा हजार लोकवस्तीचे आहे. आसपासच्या तीस ते पस्तीस वाड्या वस्त्यां पुसेसावळी शहरावर अवलंबून आहेत. पुसेसवाळी परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या सापडत आहे. वैद्यकीय यंत्रणा खूपच तोकडी पडत आहे. लवकरात लवकर पुसेसवाळी येथे सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरु करून लोकांना दिलासा द्यावा.
तसेच गत वर्षीच काशीळ येथे लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्र चालू केलेले आहे. तेथे सुद्धा कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु प्रशासकीय दप्तर दिरंगाई मुळे आज पर्यंत काशीळ येथे कोरोना केअर सेंटर चालु झालेले नाही. तरी दोन्ही ठिकाणी कोरोना केअर सेंटर चालू करावीत अशी मागणी युवा नेते धैरशील कदम यांनी केलेली आहे.