हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि राज्य सरकारच्यावतीने गरिबांसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर केले. कोरोना काळात राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफतही दिले. 30 सप्टेंबरपर्यंत हि थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता या थाळीसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. शिवभोजन थाळीचं मोफत वितरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून 10 रुपये प्रति थाळी दर आकारला जाणार आहे.
राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या काळात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून ठिकठिकाणी मोफत शिभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला. तसेच शिवभोजन केंद्रांना प्रतिदिन दीडपट मोफत थाळी वितरण करण्याचे उद्दीष्ट्यही देण्यात आले. आता पुन्हा सर्व सुरु झाले असल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवभोजन केंद्रातून देण्यात येणारी पार्सल सुविधाही आता बंद करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने कोरोना व लॉकडाउनच्या काळात मोफत शिवभोजन थाळीच्या घेतलेल्या निर्णयाचे गरिबांकडून स्वागतच करण्यात आले होते. त्याचा चांगला फायदाही झाला. आता राज्य सरकारने मोफत देण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळीचा निर्णय बदलला असून ती पूर्वीप्रमाणे 10 रुपयांना देण्याचा निर्णय घेतला आहे.