औरंगाबाद | औरंगाबाद जालना रोडवर 9 जुलैपासून राज्यात जीएसटी कार्यालयातर्फे ई-वेबील विषयी कारवाई करण्यात येत आहे. करमाड टोल नाक्यावर गुरुवार पर्यंत 14 हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 50 वाहनांकडे ई-वेबील नव्हते. यामुळे त्यांच्या कडून 60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त आयएएस जी. श्रीकांत यांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करून कारवाई केली होती. ई-वे बील बाबत एखाद्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून रस्त्यावर उतरून कारवाई केल्याचं पहिल्यांदाच निदर्शनास आले आहे. जालना वरून मोठ्या प्रमाणात स्टीलची वाहतूक होत असते. यामध्ये अनेक उद्योजक व्यापारी ई-वेबील न काढता स्टीलची तसेच अनेक साहित्यांची वाहतूक करत असतात. याकडेच लक्ष देत राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे.
कर न भरता वाहतूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. असे राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले. ही कारवाई राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड, सहाय्यक राज्यकर आयुक्त मकरंद कंकाळ, माधव कुंभारवाड, धनंजय देशमुख, तुषार गावडे यांच्यासह 24 अधिकारी आणि 87 राज्यकर निरिक्षक कर सहाय्यक या मोहिमेसाठी काम करत आहेत.