मुलाला सख्खा मामा नाही, मग दत्तामामांनी बजावलं मामाचं कर्तव्य ; राज्यमंत्र्यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मतदारसंघातील आपल्या दांडग्या जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून ओळखले जातात. संपूर्ण राज्यामध्ये ते ‘मामा’ या नावाने ओळखले जातात. दत्तामामा लोकांना किती कनेक्ट आहेत, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. मुलाला सख्खे मामा नाहीत म्हणून दत्तामामांनी नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहून मामाचं कर्तव्य बजावलं. राज्यमंत्र्यांच्या या कृतीची राज्यभरात एकच चर्चा होत आहे.

इंदापूर तालुक्यातील सराटी येथील एका विवाह समारंभाला दत्तात्रेय भरणे यांनी हजेरी लावली. सराटी येथील भैय्यासाहेब कोकाटे यांच्या लग्न समारंभाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. नवरदेवाला सख्खा मामा नसल्याने तुम्हीच नवरदेवाचे मामा व्हा, अशी विनंती कोकाटे कुटुंबाने राज्यमंत्र्यांना केली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता कोकाटे कुटुंबीयांच्या विनंतीला मान दिला. भैय्यासाहेब उर्फ प्रकाश यांचं लग्न लागत असताना स्वतः नवरदेवाच्या मागे उभा राहून राज्यमंत्री भरणे नवरदेवाचे मामा बनले आणि त्यानंतर वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले

दत्तामामांचा साधेपणा आणि कुटुंबीयांच्या विनंतीला दिलेला मान पाहून वधू आणि वरपक्षही भलता खुश झाला. आमच्या सुख दु:खात मामा असेच उभे असतात. आजही आमच्या आनंदाच्या प्रसंगात दत्तामामांनी आमची साथ निभावली, अशा भावना दोन्ही कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, यापूर्वी देखील अनेक प्रसंगातून भरणेंची संवेदनशीलता समोर आली आहे. मागील काळात अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून दवाखान्यात नेतानाचे दत्तामामांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या त्या प्रसंगी त्यांचं वागणं अतिशय साधं असतं परंतु त्यानंतर त्यांच्या वागण्याची चर्चा संबंंध राज्यभर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’