कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी. या प्रकाराकडे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपण कोरोनासारख्या महामारी विरूद्ध लढा देत आहोत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान लाकडाऊन काळात झाले. अशातच शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू झाली आहे. शेतकरी कृषी दुकानांमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे रासायनिक खते खरेदी करताना दिसत आहेत. अशा संकटसमयी सुध्दा सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा, पाटण, फलटण, वाई, माण, खटाव आदी तालुक्यातील व्यापारी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने खतांची विक्री करत असल्याचे फोन शेतकरी करत आहेत. प्रत्येक तालुक्यात प्रशासनामार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
परंतु या पथकामार्फत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही, ही पथके नुसती कागदावरच दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक होत आहे. तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा गुरुदत्त काळे यांनी सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे, आणि चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांच्यावर भरारी पथकाद्वारे कारवाई करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले. निवेदन देताना बळीराजा शेतकरी नजीर पटेल, प्रकाश पाटील, सुनील कोळी व शेतकरी उपस्थित होते.