कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या शासनाचा लसीकरण उपक्रम सुरु आहे. सुरुवातीला ६० वयावरील जनतेला लसीकरण झाले व त्यानंतर ४५ वयावरील जनतेला लसीकरण सुरु आहे. अशातच लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जितक्या लसी उपलब्ध होतात त्याचे गावनिहाय कशाप्रकारे नियोजन केले आहे, हे समजत नाही. यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होतो. याबाबत प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी कराडचे प्रांताधिकारी तसेच कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात शिवराज मोरेंनी मांडले आहे कि, १८ ते ४४ या दरम्यान जनतेचे लसीकरण होण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन नोंदणीच्या गोंधळामुळे १८ वर्षावरील जनतेचे लसीकरण थांबले आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर जितक्या लसी मिळतात त्याचे गावनिहाय वाटप योग्य प्रकारे झाले पाहिजे.
लशीच्या वाटपाची माहिती त्या- त्या गावांना मिळावी, ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशांना दुसरा डोस दिला जावा, रोजच्यारोज गावनिहाय लसींचे वाटप कश्याप्रकारे केले जात आहे. याची माहिती आदल्या दिवशी प्रसिद्ध व्हावी. तसेच लसीकरण केंद्रावर योग्य प्रकारे लसीकरणाचे नियोजन करावे. जेणेकरून अनावश्यक गर्दी टाळता येईल. असे काही मुद्दे निवेदनात मांडले आहेत. निवेदन कराडचे प्रांताधिकारी तसेच कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज देण्यात आले आहे.