औरंगाबाद – एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांचा आता चालक म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाहतूक नियंत्रकाकडे वाहकाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर एसटीचालक म्हणून त्यांना कर्तव्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यांच्याकडून आरटीओ कार्यालयात अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञाप्ती बिल्ला काढण्यात येईल. सात दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येईल.
अहवाल समाधानकारक असलेल्या कर्मचाऱ्यांना चालक म्हणून कर्तव्य दिले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.