नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार मंगळवारी सकारात्मक मूडमध्ये दिसत आहे आणि जागतिक घटकाच्या नेतृत्वाखाली आज तेजीचा कल असू शकतो. आज ही खरेदी सुरू राहिल्यास सेन्सेक्स 58 हजारांचा आकडा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी वाढीसह ट्रेड करण्यास सुरुवात केली, मात्र विक्रीचा बोलबाला झाल्यानंतर लवकरच 400 अंकांची घसरण दिसून आली. सरतेशेवटी, गुंतवणूकदारांनी पुन्हा आत्मविश्वास दाखवला आणि सेन्सेक्स 231 अंकांनी वर चढून 57,593 वर बंद झाला. निफ्टीही 69 अंकांच्या बळावर 17,222 वर पोहोचला. आज सेन्सेक्स 58 हजारांची पातळी ओलांडू शकतो, असा अंदाज आहे.
अमेरिका आणि युरोपीय बाजारात तेजी
कच्च्या तेलाच्या दरात नरमाई आल्यानंतर अमेरिकन बाजारात तेजी आली. अमेरिकेतील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज Nasdaq 1.31 टक्क्यांनी वधारला. त्याचा परिणाम युरोपीय बाजारांवर दिसून आला आणि जर्मनीमध्ये 0.78 टक्के आणि फ्रान्समध्ये 0.54 टक्के उसळी आली. मात्र, लंडनचे शेअर बाजार 0.14 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
आशियाई बाजारातही तेजी आहे
मंगळवारी सकाळी आशियातील बहुतांश बाजार तेजीसह उघडले. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.62 टक्क्यांची उसळी दिसून येत आहे, तर जपानचा निक्केई 0.96 टक्क्यांवर व्यवहार करत आहे. याशिवाय हाँगकाँगमध्ये 0.40 टक्के आणि तैवानमध्ये 0.23 टक्के वाढ झाली आहे. दक्षिण कोरियाचा कॉस्पी स्टॉक एक्स्चेंज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे, तर चीनचा शांघाय कंपोझिट 0.05 टक्क्यांनी वधारत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच आहे
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सतत विक्री सुरू आहे. FII ने सोमवारी शेअर्स विकून भारतीय बाजारातून 801.41 कोटी रुपये काढले. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा पुढे होऊन बाजाराचा ताबा घेतला. या दरम्यान देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1,161.70 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.