Tuesday, June 6, 2023

Stock Market : बाजारात तेजी, सेन्सेक्स 383 अंकांनी वधारला तर निफ्टी 18,250 वर पोहोचला

मुंबई । भारतीय शेअर बाजारात चार दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज संपुष्टात आली. सेन्सेक्स 383.21 अंकांच्या वाढीसह 61350.26 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 143 अंकांच्या वाढीसह 18268.40 वर बंद झाला. कालच्या तेजीनंतर आज निफ्टी बँकेत 45 अंकांची किंचित वाढ दिसून आली. आज बँकिंग क्षेत्रात तेजी होती.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये खरेदी आणि 10 शेअर्समध्ये विक्री झाली. ज्यामध्ये टाटा स्टीलचे शेअर्स 3.92%, टायटनचे शेअर्स 3.20% पेक्षा जास्त, नेस्ले इंडियाचे शेअर्स 2.91% वर बंद झाले. दुसरीकडे, इंडसइंड बँकेचा शेअर 1.92% नी घसरला.

ऑटो सेक्टरला दिलासा
CNBC Awaaz Exclusive ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, सेमीकंडक्टरच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकार लवकरच डिझाइन लिंक्ड प्रोत्साहन योजना आणणार आहे. पुढील पाच वर्षांत सुमारे 1000 कोटींचे इन्सेन्टिव्ह देण्याचे प्रस्तावित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच वर्षांत 15 सेमीकंडक्टर डिझाइन विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. देशातील एकूण इलेक्ट्रॉनिक डिझाईन मार्केट सुमारे $25 अब्ज आहे. पुढील पाच वर्षांत 100 सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केले जाईल.

कोटक महिंद्रा बँकेचा तिमाही निकाल
कोटक महिंद्रा बँकेने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, 2021-22 च्या जुलै-सप्टेंबर कालावधीत एकूण उत्पन्न 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 8,252.71 कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून 8,408.87 कोटी रुपये झाले आहे.

निव्वळ व्याज मार्जिन 4.45 टक्के
आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2020-21 च्या दुसर्‍या तिमाहीत 3,897 कोटी रुपयांवरून तीन टक्क्यांनी वाढून 4,021 कोटी रुपये झाले आहे. तिमाहीत निव्वळ व्याज मार्जिन 4.45 टक्के होते.

ZEE Entertainment प्रमोटर वाद
ZEE Entertainmentने 27 ऑक्टोबर रोजी होणारी बोर्ड मिटिंग रद्द केली आहे. कोरम अभावी ही मिटिंग रद्द करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरम म्हणजे सदस्यांची किमान संख्या, त्यानंतरच बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. ZEE ने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

13 विमानतळांचे खाजगीकरण
केंद्र सरकार या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारी मालकीच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) अंतर्गत कार्यरत 13 विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा विचार करत आहे. AAI ने सात लहान विमानतळांना सहा मोठ्या विमानतळांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.