औरंगाबाद – मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे लालपरी सह शिवशाही बसची मोठी दुर्दशा झाली आहे. यातच सिडको बस आगारात उभ्या असलेल्या गाड्यांच्या महागड्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवशाहीसह मालवाहतूक गाड्यांच्या 18 बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
20 जानेवारी रोजी चार शिवशाही एक लालपरी आणि चार मालवाहतूक वाहनांचा बॅटऱ्या बस आगाराच्या पार्किंग मधून चोरीला गेल्याचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पालघर, परभणी, अहमदनगर आणि औरंगाबाद विभागाच्या प्रत्येकी एक मालवाहतूक वाहनातून आठ बॅटऱ्या चोरीला गेल्या असून, शिवशाही बस क्रमांक एमएच 09 ईएम 9746, एमएच 06 बीडब्ल्यू 4368, एमएच 60 बीडब्ल्यू 4425 आणि एमएच 09 एफएल 0987 या बसच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. याशिवाय जालना विभागाच्या बसची ही बॅटरी चोरट्याने लंपास केली.
एकूण 9 वाहनातील 72 हजार रुपये किमतीच्या 18 बॅटऱ्या चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचे एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच संपामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात असून अनेक दिवसांपासून बस जागेवरून हलले नाहीत. त्यात चोरीच्या प्रकाराची भर पडली आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार बावस्कर करीत आहेत.