सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरा येथील रांजनवाडीत घडला आहे. यामध्ये जमावाने तीन गाड्यांची तोडफोड करत आरोग्य कर्मचार्यांना परतावून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि आरोग्य सेवक गेले होते. मात्र आमच्यावर घरातच उपचार करा असा तगादा लावून नागरिकांनी आलेल्या कर्मचार्याना विरोध केला. याचेळी संतप्त जमावाने प्रशासनाच्या ३ वाहनांची तोडफोड केली. जमावाने हातात काठ्या घेऊन कर्मचार्यांवरच हल्ला केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या तणाव निवळला असून गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.