औरंगाबाद प्रतिनिधी । कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील समर्थनगर भागात आमदार जाधव यांचे निवास्थान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात लोकांनी जाधव यांच्या घरावर अचानक दगडफेक केली. सोबतच अज्ञातींनी पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाडीला लक्ष करत तिची तोडफोड केली. सुदैवाने या हल्ल्यात जाधव किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणाला दुखापत झाली नाही आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस जाधव यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी जाधव यांनी शिवसेनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावर रोष असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते.