सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली बाँम्बे रेस्टाॅरंट चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको केल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोल्हापूरात सुरू असलेल्या आंदोलनाला दोन मंत्री, दोन आमदारांनी भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला होता. आज 12 वीच्या परीक्षा सुरू होत असल्याने 11 वाजल्यानंतर रास्तो रोको करण्याच्या सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी दिल्या होत्या.
कागलला महावितरणचे कार्यालय पेटविले
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला वेळोवेळी इशारा देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल (जि. कोल्हापूर) येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. स्वाभिमानीचे आंदोलन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणचे कार्यालय पेटविले होते. त्यामुळे राज्यात आज रास्ता रोको करण्यात येत आहे.