सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यासह व जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊस, ढगाळ हवामान धुके आणि कडाक्याची थंडी असं विचित्र वातावरणाचा जिल्हावासियांना दिवसभर सामना करावा लागत आहे. महाबळेश्वर, पाचगणी, भिलार येथे अवकाळी पावसाने धुडगूस घातला असून स्ट्रॉबेरीला मोठा फटका बसला आहे.
महाबळेश्वरमध्ये मुख्य बाजारपेठेसह वेण्णालेक परिसरात पर्यटकांची रेलचेल असून कडाक्याच्या या थंडीत वेण्णालेक व परिसरात हौशी पर्यटक गरमागरम चहा- भजीसह मका, कणीस, फ्रँकी अशा पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. धुक्यात नौकाविहाराचा आनंद देखील लुटत आहेत. गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत आहेत.
स्ट्रॉबेरीला दर चांगला पण पावसाचा पिकाला फटका
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे स्ट्रॉबेरीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असून, स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात पिके कुजून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. महाबळेश्वरसह पाचगणी, मेतगुताड, भिलार आदी भागांसह तालुक्यात संपूर्ण दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीची पीक घेतले जाते. सध्या स्ट्रॉबेरीचा 300 ते 350 रुपयांपर्यंत प्रती किलो दर आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळामध्ये कीड आणि आळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पाण्यात साचलेला या स्ट्रॉबेरी पिकाला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.