औरंगाबाद – जिल्ह्यात कर्मचारी संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प पडली होती. परंतु, काही दिवसांपासून एसटीची प्रवासी वाहतूकसेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. यात बुधवारी चार हजार तर गुरूवारी 97 एसटी बसने तब्बल 8110 प्रवाशांनी प्रवास केला.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्यानंतर एसटीची चाके अंशत: गतिमान झाली होती. मात्र ती गती वाढताना दिसत नसली तर एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढल्याने एसटीला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी 97 एसटी बसने 313 फेऱ्या केल्या. यात पुणे मार्गावर 18 शिवशाही आणि एका हिरकणीने 19 फेऱ्या केल्या, त्याचा 718 प्रवाशांनी लाभ घेतला. नाशिक मार्गावर सात शिवशाही बसने 14 फेऱ्याकरून 183 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले.