औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे संपकाळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दिवसभरात 40 एसटी बस मार्फत 62 फेऱ्या करण्यात आल्या, त्यातून दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला तर 62 कर्मचाऱ्यांनी ड्यूटी बजावली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे, असे असले तरीही कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. रविवारी औरंगाबाद-पुणे मार्गावर 18 शिवशाहीतून 738 प्रवाशांनी प्रवास केला. तर नाशिक मार्गावर तीन खासगी शिवशाही बसमधून 110 प्रवाशांनी प्रवास केला. याशिवाय सिडको जालना मार्गावर आठ लालपरीने सोळा फेऱ्या केल्या, त्यातून 146 प्रवाशांनी प्रवास केला. तर सिल्लोड मार्गावर चार बसने आठ फेऱ्या केल्या, कन्नड मार्गावर एका बसने दोन फेऱ्या केल्या. कन्नड आगाराच्या चार बसने औरंगाबाद मार्गावर आठ फेऱ्या केल्या तर सोयगाव आगाराच्या दोन बसने औरंगाबाद मार्गावर चार फेऱ्या करण्यात आल्या.
काल दिवसभरात एकूण 19 आणि 21 शिवशाही अशा 40 बसने 62 फेऱ्या केल्या आहेत. यातून 2031 प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतला आहे. तर 22 चालक, तीन चालक कम वाहक आणि 36 वाहक अशा 62 कर्मचाऱ्यांनी रविवारी सेवा बजावली आहे.