हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचं नातं तस जिव्हाळ्याचे… अगदी बालवाडीपासून शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मित्रही असतो आणि मार्गदर्शकही असतो… त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी लहान वयापासूनच शिक्षकांचा लळा लागतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या आवडत्या एका महिला शिक्षकाची बदली मागे घ्यावी म्हणून एका चिमुकल्याने थेट शरद पवारांना पत्र पाठवलं आहे. ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा अशा आशयाचं पत्र शरद पवारांना पाठवण्यात आलं आहे. ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.
कोणत्या शाळेतील प्रकार –
सदर घटना हि पुण्यातील हडपसरमधील शाळेत घडली आहे. या शाळेतील महिला शिक्षिका शारदा दवडे यांची बदली झाली हे कळताच त्यांच्या वर्गातील मुलांनी त्या शिक्षिकेला गराडा घातला आणि ढसाढसा रडू लागले. तर हमीद सुयोग बेंद्रे या विद्यार्थ्यांने तर बाईंची बदली रद्द करा अशी मागणी करणारे पत्र थेट शरद पवारांनाच लिहिले.

काय आहे पत्रातील मजकूर ?
“माझे नाव-हमीद सुयोग बेद्रे. माझ्या शाळेचे नाव-साधना प्राथमिक विद्यामंदिर, पुणे हडपसर-28 मी इयत्ता – तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिकाः सौ. शारदा दवडे ताई आहेत. मला आज असे कळले आहे की त्या मला उदया पासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची बदली अचानक केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला पप्पांना विचारले की, बाईना परत आणायला करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं की, तुम्ही आमच्या ताईना परत आणू शकता. कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा. असं पत्र तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या हमीदने शरद पवारांना पाठवलं आहे. लहान वयातही मुलांना किती मोठी समज येतेय याच हे जिवंत उदाहरण म्हणता येईल.




