कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने अथक परिश्रमाने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले. वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मौजे मारुल तर्फ पाटण येथे लक्ष्मण चौधरी यांच्या मालकीच्या विहिरीत गवा पडल्याचे वन विभागाला समजल्यानंतर सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, परिक्षेत्र वन अधिकारी एल. व्ही. पोतदार, पाटण वनपाल वाय. एस. सावर्डेकर, हेळवाक वनपाल संतोष यादव, वनमजूर पाटण संजय जाधव, वनमजुर पाचगणी यशवंत बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील गव्याची पाहणी केली.
वन अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी तात्काळ हालचाली सुरू केल्या. गव्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने तात्काळ जेसीबीच्या साह्याने विहिरीचा काठ खोदून तात्पुरता रॅम्प तयार केला आणि या रॅम्पवरून या गाव्याला विहिरीतून बाहेर येण्यासाठी जागा करून देण्यात आली. गवा सुखरूप बाहेर आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.