सातारा | दरोड्याचा गुन्हा 48 तासात उघडकीस आणून पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे येथे रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुलाच्याखाली तीन दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी एकाची पिकअप व्हॅन थांबवून त्याच्या डोळ्यात चटणी टाकून खिशातील मोबाइलसह 52 हजार 680 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यांचा छडा केवळ 48 तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी सचिन रावसाहेब पवार (वय- 25), सोमनाथ गोपीनाथ गायकवाड (वय- 23, दोघेही रा. सदाफुलेवस्ती, जामखेड, जि. अहमदनगर), गोविंद वासुदेव घुमरे (वय- 24, रा. पारगाव शिरस, ता. जि. बीड), शिवाजी महादेव अडागळे (वय- 33, सध्या रा. वनवासवाडी, ता. सातारा), दशरथ भुजंग क्षिरसागर (वय-32, रा. प्रतापसिंह नगर, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल म्हणाले, दि. 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्याखाली तीन वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी विनायक विजय हाके (वय-30, रा. बोरगाव, ता. वाळवा) याची पिकअप व्हॅन थांबवून तू सोनगाव रोडला पिकाला धडक देऊन आला आहेस. असे सांगत त्याच्या डोळ्यात चटणी टाकून खिशातील मोबाइल काढून घेतला. अन्य अनोळखी इसमांनी पिकअप व्हॅनच्या ड्रायव्हरमध्ये ठेवलेले 52 हजार 680 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. पथकाने घटनास्थळी पाहणी करून या गुन्ह्यातील फिर्यादी तसेच त्याच्यासोबत हजर असलेला गाडीवरील क्लिनर, इतर साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता पथकाला एक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सातारा शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारांना मार्फत खातरजमा केली असता हा गुन्हा सातारा शहरातील एका संशयिताने त्याच्या जामखेड, जि. अहमदनगर आणि बीड येथील साथीदारांसह असून संबंधित संशयित त्याच्या मूळ गावी भुम, जि. उस्मानाबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम व बीड येथे जाऊन वरील पाच जणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे आदींनी सहभाग घेतला.