औरंगाबाद : शहर व परिसरात आज दुपारी झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसाने जिथे जागा मिळेल जिथे आडोसा मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी थांबणे पसंत केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने नागरिकांना थोडीशी का होत नाही उसंत मिळाली. त्यामुळे उन्हापासून थोडासा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना व आधीच हैराण झालेल्या नागरिकांसह उद्योग व्यवसायाची वाट लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळीही पावसाने काही भागांत पावसाने हजेरी लावली आणि त्यातच आज दुपारी २ ते २.३० च्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही भागांत वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
गेल्या कित्येक दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात बेमोसमी पडणा-या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. अवकाळी पाउस, कोरोनाचे संकट या दुहेरी संकटाचा सामना शेतक-यांना सध्या करावा लागत आहे. अवेळी आणि अचानक पडणा-या पावसामुळे वातावरणात कायम बदल होत असले तरी शेतकरीवर्ग मात्र चिंताग्रस्त झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.