चंदेरी दुनिया । हिंदी कलाविश्वातील ‘ग्रीक गॉड’, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अभिनेता हृतिक रोशन याच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आतापर्यंत गेली अनेक वर्षे हृतिक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नव्या जोमाच्या कलाकारांसाठी एक प्रेरणास्त्रोतही ठरत आहे. पण, तुम्हाला माहितीये का याच हृतिकचा कोणीतरी रागही करायचं…
बसला ना तुम्हालाही धक्का? हृतिकचा कोणी राग का करेल, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? या प्रश्नाच्या उत्तराशी एक रंजक किस्सा जोडला गेला आहे. ज्याचा उलगडा केला आहे दाक्षिणात्य चित्रपटांमधील नावाजलेल्या अभिनेता किच्चा सुदीप याने. ‘दबंग ३’ या चित्रपटातून किच्चा सलमान खानसोबत झळकणार आहे. त्यापूर्वीच आता एका मुलाखतीत त्याने याविषयीचा महत्त्वाचा उलगडा केला. ज्याच्याशी थेट ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आणि रागही जोडला गेला आहे

‘बॉलिवूड लाईफ’शी संवाद साधतेवेळी -हृतिकविषयी बोलताना किच्चा म्हणाला, ”माझी पत्नी हृतिकची चाहती आहे. त्यामुळे जेव्हा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी स्वत: हा चित्रपट १० वेळा चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहिला होता. कारण चित्रपट पाहायला न गेल्यास मी कोणा दुसऱ्यासोबतच जाऊन तो पाहिन अशी धमकीच ती मला देत होती.”
पत्नीच्या आवडीखातर किच्चाने हा चित्रपट पाहिला. पहिल्यांदाच चित्रपट पाहिल्यानंतर हृतिकचा अभिनय, त्याचं नृत्यकौशल्य हे सारंकाही त्यालाही आवडलं. पण, त्यानंतर मात्र मी इतका राग कोणाचाच केला नव्हता. कारण, हृतिक जेव्हा जेव्हा पडद्यावर यायचा तेव्हा तेव्हा ती (पत्नी) माझा हात पकडून अक्षरश: मला चिमटा काढायची. तेव्हा मग तिच्यावर चिडून मीसुद्धा अभिनेता आहे, अभिनेता आहे असं किच्चाने तिला सांगितलं होतं. हृतिकसोबतची किच्चाही ही आठवण नक्कीच खास आहे, ज्या आधारेच तो म्हणतो की हृतिकसोबत आपण चित्रपट केल्यास सेटवर येणारी पहिली व्यक्ती ही माझी पत्नी असेल असं तो मोठ्या विश्वासाने सांगतो.




