उद्धव ठाकरेंनी ‘या’ कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केल्यांनतर आता सुहास कांदे यांनीही ठाकरेंवर पलटवार करताना एक नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी राजीनामा दिला असा सनसनाटी दावा त्यांनी केलाय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सुहास कांदे म्हणाले, उद्धव साहेबानी भावनेचं राजकारण बंद करावं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी दिला. त्यांच्यावरची अटकेची तलवार होती, जर यांना अटक झाली तर त्यांच्या चौकशीतून संशयाची सुई कोणाकडे जाईल, या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. याबाबत माझीही नार्को टेस्ट करा आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा नार्को टेस्ट करा. जर ते म्हणाले की, मी पाटणकरांसाठी राजीनामा दिलेला नाही, तर मी राजीनामा देईन असेही सुहास कांदे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सुहास कांदे यांच्यावर 50 खोक्यांवरून आरोप केले. याबाबत उत्तर देताना सुहास कांदे म्हणाले, खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. त्यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेतले त्यांचीही नार्को टेस्ट करा. सरकार बदलण्यासाठी जर मी एक रुपया जरी घेतल्याचं माझ्या नार्को टेस्ट मध्ये आढळलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल असे म्हणत सुहास कांदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.