Wednesday, October 5, 2022

Buy now

जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची आत्महत्या

गेवराई : हॅलो महाराष्ट्र – गेवराईमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना 6 मार्च रोजी मध्यरात्री माऊलीनगर या शहरात घडली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि घटना उघडकीस आली. सुनील दामोदर गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे.

या आरोपीने झोपेत असताना पत्नी व दोन मुलांवर हल्ला चढविला होता. यामध्ये पत्नी व मुलाचा मृत्यू झाला होता, तर मुलगी या हल्ल्यातून वाचली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी सुनील दामोदर गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो पॅरोलच्या रजेवर आला होता.

मृत सुनील दामोदर गायकवाड हा पोटाच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे तो निराश होता. याच नैराश्यातून सुनीलने मध्यरात्री घरातील दुसऱ्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा घरातले जागे झाले तेव्हा हि धक्कादायक घटना उघडकीस आली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अंमलदार नवनाथ गोरे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. तसेच या घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.